गस्तीच्या स्वयंसेवकांनी केली मदत
निगडी : सततच्या पाणी गळतीमुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले. पहाटे झालेल्या या अपघातावेळी कोणीच मदतीसाठी आले नाहीत. मात्र रात्रीची गस्त घालून आलेल्या स्वयंसेवकांनी या दुचाकीस्वारांना मदत केली. जखमी अवस्थेत असणार्या आकाश माळी (वय 23, रा. हडपसर) व विकास गोंधळे (वय 26) यांना तातडीने प्रथमोपचार मदत समिती सदस्यांनी दिली. गंभीर जखमी नसल्यामुळे त्यांच्या घरी मोबाइलद्वारे कळविण्यात आले. पिंपरीत राहणारे त्यांचे नातेवाईक त्वरित तेथे पोहचले. तरुणांना त्यांच्याकडे सोपवून सदस्य आपपल्या घरी गेले.
प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 27 येथे स्वामी विवेकानंद चौक ते हुतात्मा चौक रस्त्या दरम्यान पहाटे साडे पाचच्या सुमारास पाणी गळतीमुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर एक दुचाकी घसरली. दुचाकीवरील दोन्ही नागरीक खाली पडले होते. यावेळी येथे कुणीच नसल्याने ते दोघे मदतीसाठी वाट पाहू लागले. या दरम्यान रात्रगस्त करुन परतत असणारे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र स्वयंसेवक अर्चना घाळी, विशाल शेवाळे, अजय घाडी, नितीन मांडवे, बाबसाहेब घाळी तसेच समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी त्या अपघातग्रस्त युवकांना बघितले.