पिंपरी : महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणी दरवाढीविरूद्ध जागरूक नागरीक संघटनेतर्फे सोमवारी (दि. 16) आंदोलन करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारत कार्यालयासमोर दुपारी चार वाजता हे आंदोलन होणार आहे. महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या पाणी दरवाढीमुळे नागरीकांना चारपट पाणी बिले येणार आहेत. महागाईने आधीच पिचलेल्या जनतेला या दरवाढीमुळे अधिकच खाईत जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे अवैध बांधकामांवरील शास्त्री कर रद्द करा, सातशे चौरस फुटाच्या आतील घरांची घरपट्टी माफ करा, वायसीएम रुग्णालयातील गैरकारभाराची चौकशी करा, त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमा, भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण थांबवा आदी मागण्याही या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. त्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे निमंत्रक डॉ. सुरेश बेरी यांनी सांगितले.