भोसरी : पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चारजणांनी मिळून जबरदस्तीने 27 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 30) रात्री अकराच्या सुमारास मदने चाळ, पार्वती हाईटजवळ, लांडेवाडी येथे घडली. सौरभ सुरेश ओझा (वय 20, रा. मदने चाळ, पार्वती हाईट जवळ, लांडेवाडी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 20 ते 22 वर्ष वयाच्या चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ त्यांच्या मित्रांसोबत मदने यांच्या चाळीमध्ये भाड्याच्या खोलीत राहतात. रविवारी रात्री अकराच्या सुमारास 20 ते 22 वर्ष वयाचे चार तरुण फिर्यादी यांच्या खोलीच्या बाहेर आले. त्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करून खोलीत प्रवेश केला. चौघांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. चौघांनी मिळून सौरभ आणि त्यांच्या मित्रांचे पैसे, मोबाईल फोन आणि घड्याळ असा एकूण 27 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोर तपास अधिक करीत आहेत.