पाणी पुरवठा योजनेसाठी 6.23 कोटीचा निधी प्राप्त

0

दोंडाईचा । गेल्या अनेक वर्षापासून प्रसार माध्यमांमध्ये चांगलाच गाजलेला शिंदखेडा पाणीपुरवठा योजनेचा विषय अखेर मार्गी लागला आहे, गेल्या 2 महिन्यापूर्वी राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी पाठपुरावा करून शिंदखेडा शहरासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्या मंजूरीचे पत्र शिंदखेडा शहराचे गटनेते प्रा.सुरेश देसले आणि अनिल वानखेडे यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांना दिले होते, या योजनेसाठी शासनाने पहिल्या हप्तापोटी 6.23 कोटीचा निधी वितरीत केला असून या निधीतून योजनेच्या कामाला प्रत्यक्षास सुरवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणा-या शिंदखेडा शहराचा पाणीप्रश्न अखेर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना सोडविण्यास यश आले आहे.

तीव्र पाणीटंचाईचा सामना
शिंदखेडा हे तालुक्याचे शहर असतांना याठिकाणी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता, याठिकाणी सर्व प्रशासकिय कार्यालये असल्यामुळे तालुक्यातील दररोज 5 ते 10 हजार जनता याठिकाणी येत असते, त्यामुळे याठिकाणी पुढच्या 30 वर्षाचे नियोजन करून नविन पाणीपुरवठा योजना साकारण्याची मागणी येथील आमदार तथा राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांची होती, मागील शासनात अनेकदा हा विषय माध्यमांमध्ये गाजत होता, पंरतू प्रत्यक्षात योजनेच्या कामाला मंजूरी मिळत नव्हती, जयकुमार रावल हे मंत्री झाल्याबरोबरच त्यांनी राज्य शासनाकडून तातडीने शिंदखेडा पाणीपुरवठा योजनेसाठी 21 कोटीचा निधी मंजूर करून घेतला होता, त्या निधीतून पहिला हप्ता 6.23 कोटीचा वितरीत करण्यात आला असून लवकरच योजनेच्या कामास प्रत्यक्षास सुरवात होणार असून शिंदखेडा वासीयांचे स्वप्न अखेर साकार होणार आहे.