पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी खासदार बारणेंकडून आयुक्तांना पत्र

0

पिंपरी चिंचवड   पवना धरणात 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. शनिवारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरु केला आहे. तरीही दिवसाआड पाणी येत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची शनिवारी आयुक्त कार्यालयात भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे,शहराध्यक्ष योगेश बाबर, नगरसेवक निलेश बारणे, उर्मिला काळभोर, सरिता साने, रेखा दर्शिले, सचिन भोसले, अनंत को-हाळे, रोमी सिंधू, राजेश वाबळे, शैला पाचपुते, बाळू दर्शिले, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पावसाळ्यातही एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. पवना धरण परिसरात भरपूर पाऊस झाला आहे. पवना धरण 98 टक्के भरले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधा-यातून पाणी उचलण्यात येते. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करणे बंधनकारक असताना देखील प्रशासन एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आडमुठे धोरण अवलंबित आहे. 11 जुलै रोजी पत्र देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र, अजूनही महापालिका प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “सध्या शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. पवना धरण देखील जवळपास भरले आहे. पाण्याचा विसर्ग देखील सुरु झाला आहे. आता धरण भरलेले असले तरी पुढील दोन महिन्यातील मान्सूनचा अंदाज घेऊन पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत महापौर, गटनेत्यांशी आणि प्रशासनाशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाणार आहे”