पाणी पुरेसे द्या अन्यथा कायदा हातात घेऊ!

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहरातील नागरिकांना पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा कायदा हातात घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समिती सभापती सुनील शेळके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सत्तारुढ पक्षाच्या पदाधिकारी आणि पाणीपुरवठा सभापतीनींच मुख्याधिकार्‍यांना कायदा हातात घेण्याचे निवेदन दिल्याने शहरात याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

प्रशासन नाठाळ म्हणून बाका प्रसंग
मुख्याधिकारी वैभव आवारे यांना शेळके यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरातील नागरिकांना पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी वेळेवर मिळत नाही. प्रशासनाच्या सुस्तपणामुळे काही भागातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. पवना व इंद्रायणी नदीवरून रोज शहरासाठी दोन कोटी वीस लाख लीटर पाणी उपलब्ध असूनही पाणीपुरवठा विभागातील नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या दोन्ही नद्यांवरील पंप, पंपहाऊस, दोन्ही भागातील फिल्टर प्लॅट, मुख्य जलवाहिन्या, साठवण टाक्या, वितरण जलवाहिन्या यांची दुरवस्था आणि बेकायदेशीरपणे शहर व शहराच्या हद्दीबाहेर दिलेली नळ कनेक्शन आदी बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील, प्रशासन कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने ही वेळ आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.