पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरातील राज्य सरकारशी प्रलंबित प्रश्न आणि आंद्रा व भामा-आसखेड धरणातून शहरवासियांसाठी पाणी आणण्याची योजना तसेच रखडलेला बंद पवना जलवाहिनी प्रकल्प या महत्वाच्या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी येत्या शुक्रवारी 20 आणि शनिवारी 21 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अधिका-यांसमवेत नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात बैठक आयोजित केली आहे.
याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. या बैठकीत पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे सचिव, आमदार लक्ष्मण जगताप, मावळचे आमदार बाळा भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.
आंद्रा धरणातून 36.87 एमएलडी आणि भामा-आसखेड धरणातून 60.79 एमएलडी पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहरासाठी देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्या बाबतचा फेरप्रस्ताव पालिकेने सादर केला आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसोबत एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार फेरप्रस्ताव तयार केला आहे.
पालिकेने मुदतीमध्ये जलसंपदा विभागाकडे रक्कम जमा न केल्याने आरक्षण रद्द झाले आहे. धरण पुर्नस्थापनेसाठी 200 कोटी रूपये देण्यास पालिका तयार आहे. मात्र, धरणग्रस्त पुनवर्सनासाठीची रक्कम त्यातून वळती करण्याची मागणी पालिकेची आहे. धरणग्रस्त पुनर्वसनासाठीची सुमारे 270 कोटी रूपये रक्कम आहे. तसेच, आंद्रा धरणातून सोडलेले पाणी इंद्रायणी नदीतील देहू बंधारा येथून घेण्यास अद्याप जलसंपदा विभागाची मान्यता मिळालेली नाही. तसेच, पवना धरणातून बंद जलवाहिनी योजना प्रलंबित असून, त्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत सुमारे 22 लाखाच्या घरात आहे. लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेवून भामा आसखेड धरणातून 146.986 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा पिंपरी-चिंचवडसह, चाकण शहराला मंजूर झालेला आहे. हे पाणी शहरवासियांना त्वरित मिळण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे’.