पाणी प्रश्‍नावर नगरसेवक व स्थानिक आमने-सामने

0

माजी नगरसेवक दुर्गे यांनी केले चर्चासत्राचे आयोजन

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील नागरिकांना पाणी तसा नवीन नाही. परंतू ऐन पावसाळ्यात शहरवासियांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मंगळवारी काळभोरनगर परिसरामध्ये पाणी प्रश्‍नावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 14 मधील काळभोर नगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात देखील प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईच्या विरुद्ध नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यातील समोर-समोर चर्चासत्राचा रंगलेला सामना काळभोरनगरवासियांना अनुभवयास मिळाला.

काळभोरनगरमध्ये झाले चर्चासत्र
पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी पाणी प्रश्‍न उन्हाळ्यामध्ये जाणवत होता. आता पावसाळा सुरू होऊनही पाणी प्रश्‍न सोडविला जात नाही. ‘पाणी प्रश्‍न’ या विषयावर नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांच्यातील चर्चासत्र असा कार्यक्रम मंगळवारी काळभोर नगर येथे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास अ प्रभाग समितीच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेक प्रमोद कुटे, वैशाली काळभोर तसेच मनपा स्वीकृत नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे, माजी नगरसेवक मारुती भापकर आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 14 मधील काळभोरनगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन या परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात देखील प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईच्या विरुद्ध नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यातील समोर-समोर चर्चासत्राचा रंगलेला सामना काळभोरनगरवासियांना अनुभवयास मिळाला.

नगरसेवकांची झाली दमछाक
कार्यक्रमात स्थानिकांनी उपस्थित नगरसेवकांना पाणी प्रश्‍नाबाबत अक्षरशः फैलावर घेतले. यावेळी नागरिकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना नगरसेवकांची पुरती दमछाक झालेली दिसून येत होती. प्रचंड पाणी टंचाईने या भागातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यामुळे त्यांचा रोष त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत होणे कामी थेट लोकप्रतिनिधींना समोरा-समोर जाब विचारण्याच्या मिळालेल्या संधीचा नागरिकांनी पुरेपुर उपयोग करुन घेतला. 15 जुलैच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे नगरसेवकांकडून अक्षरशः वदवून घेतले. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारीदेखील उपस्थित राहणार होते. परंतु आयुक्तांचा पालखी नियोजन उद्याचा दौरा अचानक आजच घेतल्यामुळे ते उपस्थित राहु शकले नाहीत. परंतु अ प्रभाग अध्यक्षा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी 15 जुलै पर्यंत संपुर्ण पाणी पुरवठा सुरळीत करुन देण्याचे आश्‍वासन उपस्थित नागरिकांना दिले. तेव्हा कुठे नागरिकांचा रोष कमी झाल्याचे दिसले. कार्यक्रमास काळभोर नगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांची उपस्थिती भरपुर होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले तर आभार आमीन यांनी मानले.