जळगाव : तालुक्यातील विदगाव येथे पाणी फेकण्याच्या कारणावरून महिलेला बादलीसह काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा
विदगाव येथे एकनाथ भिवा सोनवणे (68) हे पत्नी तसेच कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. मंगळवार, 7 जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाणी फेकल्याने त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी एकनाथ सोनवणे यांच्या पत्नी विमलबाई या गेल्या असता शेजारी राहणार्या पार्वताबाई किशोर नन्नवरे, यमुनाबाई कैलास सोनवणे या दोन जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत विमलबाईचे दोन दात पडले. त्यानंतर दुसर्या दिवशी बुधवार, 8 जून रोजी सकाळी विमलबाई या त्यांच्या मुलीशी बोलत असताना शिवीगाळ केल्याचा गैरसमज करून पार्वताबाई नन्नवरे, यमुनाबाई सोनवणे, कैलास सोनवणे, सचिन कैलास सोनवणे या चार जणांनी विमलबाई यांना घरासमोर येऊन मारहाण केली तसेच सचिन सोनवणे यांनी त्यांच्या पायावर तर कैलास सोनवणे विमलबाई यांच्या छातीवर तसेच पाठीवर काठीने मारहाण केली. विमलबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी विमलबाई यांचे पती एकनाथ सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.