भोसरी : पाण्याची बाटली न दिल्याच्या रागातून एकाने दुकानात घुसून तोडफोड केली. ही घटना संभाजी कॉलनी मोशी येथे शनिवारी सायंकाळी घडली. पायल राजाराम चौधरी (वय 24, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गोविंद तांबोरे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे संभाजी कॉलनी मोशी येथे मॉजीसा सुपर मार्केट येथे किराणा दुकान आहे. शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता आरोपी गोविंद त्यांच्या दुकानात आला. त्याने पाण्याची बाटली मागितली. पाण्याची बाटली चौधरी यांनी दिली नाही. याचा राग मनात धरून गोविंद याने चौधरी दांपत्याला शिवीगाळ केली. दुकानात जबरदस्तीने घुसून दुकानातील किराणा सामानाचे नुकसान केले. तसेच बघून घेण्याची धमकी देऊन निघून गेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.