उल्हासनगर : शाळेच्या बॅगा शिवण्याच्या दुकानात कामाला जात असणार्या 35 वर्षीय महिलेचा पाण्याच्या टँकरने बळी घेतला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी टँकरचालकाला अटक केली आहे. कल्याण पूर्वेतील खेडेगोळवली भागात अष्टविनायक सोसायटीमध्ये राहणारी जया बळीराम झरेकर ही उल्हासनगरातील पवई चौकात असणार्या शाळेच्या बॅगा शिवण्याच्या दुकानात काम करते. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जया ह्या कामावर रस्त्याच्या कडेने जात असतानाच, मागून येणार्या विजय वॉटर सप्लाय या पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत जया यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी धाव घेऊन टँकर थांबवून ड्रायव्हरला पकडले. गोविंद बंटी गायकवाड असे अटक टँकरचालकाचे नाव आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.