शिवणे । खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर शिवणे नांदेड गावांना जोडणार्या पुलावरून शनिवार एक दुचाकी वाहून गेली, तर दुचाकीचालक मात्र बचावला.
दुपारी 11.45 च्या सुमारास एक परप्रांतीय दुचाकीचालक घेऊन नांदेड सिटीमधून शिवणेच्या दिशेने जात होता. यावेळी खडकवासला धरणातून 9 हजार 416 क्युसेक वेगाने पाणी मुठा नदीत सोडण्यात येत होते. त्यामुळे शिवणे नांदेड या गावांना जोडणार्या पुलाच्या संरक्षक दगडांच्यावरून पाणी वाहत होते. मात्र, तशाही परिस्थिती काही किलोमीटर अंतराचा वळसा वाचवण्यासाठी या दुचाकीचालकाने आपल्या ताब्यातील दुचाकी जीवावर उदार होऊन वेगाने वाहत असलेल्या पाण्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी नांदेड गावच्या ग्रामस्थ, तरुणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याने दुचाकी पुलावर दामटली. मात्र, अर्धा अधिक पूल ओलांडताच पाण्याच्या वेगापुढे त्याच्या गाडीचा तोल जाऊ लागला. दुचाकी पाण्यावर फेकली गेली. त्याने यावेळी गाडी पकडण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, जिवापेक्षा गाडी महत्वाची नसल्याचे ओळखून, अखेर त्याने गाडी सोडून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.