दिलीप बराटे यांचा आरोप : कोणतीही चर्चा होत नसल्याचा दावा
पुणे : पक्षांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर महापौर मुक्ता टिळक प्रत्येकवेळी आपण पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगतात. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही चर्चा होत नसल्याचा दावा महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पाण्याबाबत महापौरांनी एकदाही कोणत्याही विरोधीपक्षांच्या गटनेत्यांसह भेट घेतलेली नाही. तसेच आश्वासन दिले असले तरी, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शहरात कपात सुरूच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. बराटे म्हणाले, महापौरांकडून वारंवार शहराला पुरेसे पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनाकडून दर गुरुवारी पाणी बंद ठेवले जात आहे. या शिवाय, अधून-मधून दुरुस्तीच्या नावाखाली पाणी बंद ठेवले जात आहे. ही अप्रत्यक्ष कपातच आहे. जर महापौरांना शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी विरोधीपक्षांच्या गटनेत्यांना एकदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यास बोलावले नाही. तसेच त्या स्वत: ज्या ज्या वेळी त्यांना भेटत आहेत ते पक्षाच्या कामासाठी भेटत असून त्यात पाण्यावर चर्चा होत नसल्याचा दावा बराटे यांनी केला आहे.
दिशाभूल करण्याचे कारण नाही
शहराला जो पुरवठा होतो. तो नियमितच आहे. त्याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. त्यामुळे दिशाभूल करण्याचे कोणतेही कारण नाही. तर पाणी बंद असणे ही प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. हे बराटे यांनी लक्षात घ्यावे. तसेच पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांशी आमची भेट होत असली तरी आमच्या पक्षाच्या कार्यक्रमाला यायला विरोधी पक्ष नेते तयार असल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करतो, असे प्रतिउत्तर महापौरांनी दिले.