पात्र ठरल्यानंतरही नियुक्ती आदेश नाही

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या विविध पदांकरीता 2014 मध्ये झालेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट- क या पदासाठी पात्र ठरलेल्या तिघांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शासनाकडून नियुक्ती देण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर देखील विलंब होत असल्याने आज सदर तिनही उमेदवारांकडून जि.प. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या 2014 मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीत शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी व मराठा आरक्षणाच्या खुल्या राखीव पदांवर अकरा महिन्याच्या कालावधीसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट- क या पदाकरीता हेमचंद्र अर्जुन कोळी, सागर विश्‍वनाथ कापडे व दादाभाऊ जोरसिंग चव्हाण हे तिघेजण पात्र ठरले होते.

वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष
नियुक्ती मिळण्यास विलंब होत असल्याने, जिल्हा परिषद प्रशासनाने नियुक्ती द्यावी याबाबतचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. तरी देखील जिल्हा परिषद प्रशासनाकडून नियुक्ती देण्यात आलेली नाही. यानंतर वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला असता, दोन वर्षानंतर देखील नियुक्ती मिळालेली नाही. मुख्य म्हणजे शासन आदेशानुसार अकरा महिने व त्यानंतर सहा महिन्यांचा वाढीव कालावधी देण्यात आला. पण सदर उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्यात आले नसल्याने नुकसान होत असून, जिल्हा परिषद प्रशासनाने नियुक्ती देण्यासंदर्भात विचार करावा या मागणीचे निवेदन आज जिल्हा परिषदेला देण्यात आले. लवकर नियुक्ती न दिल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा उमेदवारांकडून देण्यात आला आहे.