फैजपूर : संकटकाळात समाजातील आर्थिकरीत्या दुर्बल असणार्या सर्व घटकांसाठी भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून आपल्या सार्वजनिक वितरण विभागाद्वारे मोफत धान्य वाटप सुरू आहे परंतु ह्या योजनेची अंमलबजावणी होत असताना सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास होत असून रेशन दुकानात धान्य देताना कार्डधारकाचे वा त्या कार्डवरील व्यक्तींचे नाव आधारशी लिंक आहे हे तपासले जाते परंतु काही कारणास्तव काही लोकांचे आधार कार्ड लिंक नाही व ऑनलाइन प्रणालीमध्ये त्यांचे नावे समाविष्ट नाहीत या कारणामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहत असल्याने अशा नागरीकांना धान्यापासून वंचित न ठेवता त्यांना धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. प्रसंगी आमदार राजुमामा भोळे, आमदार स्मिता वाघ, भाजपा सरचिटणीस हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कुणीही धान्यापासून राहू नये वंचित
कुणीही लाभार्थी धान्यापासून वंचित ठेवू नये, असे सक्त निर्देश केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना दिले आहेत. याबाबत नागरी व अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत माहिती जाहीर केली. आधार नसल्याच्या कारणावरून कोण्याही व्यक्तीचे नाव रेशनकार्डवरून काढता येणार नाही हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरे कुठलेही ओळखपत्र ग्राह्य धरावे, पण एकही पात्र नागरीक ह्या नाजूक काळात वंचित राहू नये या संदर्भात योग्य सूचना संबंधिताना निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणी हरीभाऊ जावळे यांनी केली आहे.
जिल्हा प्रशासनाचे मानले आभार
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या ह्या जागतिक महामारीत जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा अगदी सक्षमपणे अहोरात्र सामान्य जनतेच्या सेवेसाठी झुंजत आहे. त्यात सर्व शासकीय कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी इत्यादी कर्मचार्यांचे कार्य अगदी प्रशंसनीय आहे. ह्या सर्वांचे नेतृत्व अगदी भक्कमपणे जिल्हाधिकारी सांभाळत आहात यासाठी त्यांचेही हरीभाऊ जावळे यांनी आभार मानले आहे.