पुणे :- पुण्यातील पानशेत पूरग्रस्तांना दिलेले गाळे (घरे) त्यांच्या मालकी हक्काची करण्यासाठी रक्कम जमा करण्यास मुदत देण्याचा तसेच पूरग्रस्तांनी केलेली अतिक्रमणे दंड घेऊन नियमित करण्यास आज मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्वत: मान्यता दिली. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे 3988 पूरग्रस्त गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. यासंदर्भात आमदार मेधा कुलकर्णी यांच्या विनंतीनुसार पाटील यांनी बैठक घेवून हा निर्णय घेतला.
बैठकीला यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी, पुण्याच्या आमदार मेधा कुलकर्णी, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, पानशेत पुनर्वसन प्रकल्प समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे आदी यावेळी उपस्थित होते.
पुण्यामध्ये पानशेत पूरग्रस्तांना ३९८८ गाळे देण्यात आले होते. त्यातील अनेकांच्या नावावर हे गाळे नसल्याने त्यांच्याकडील पूरग्रस्त असल्याचे पुरावे व महसूल यंत्रणेकडील नोंदी तपासून हे गाळे मालकी हक्काने देण्यासाठी शासनाने ठरविलेली रक्कम जमा करण्यास पाटील यांनी मंजुरी दिली. 31 डिसेंबर 2018 पर्यंत पूरग्रस्तांना पैसे भरण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तांनी त्यांना दिलेल्या जमिनी व गाळ्यांवर केलेली अतिक्रमणे, हस्तांतरितांनी केलेली व बाहेरील व्यक्तिंनी केलेली अतिक्रमणे राज्य शासनाने ठरविलेल्या दंडाची रक्कम भरून नियमित करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. यामुळे पूरग्रस्तांच्या 103 सोसायट्यांना फायदा होणार आहे.