खासदार आढळराव, आमदार वळसे पाटलांना मुदतबंद कार्यक्रम
पाबळ केंदुरसह बारा गावातील ग्रामस्थांचा बैठकीत इशारा
शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) व परिसरातील गावातील पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. गेली अनेक वर्षे या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी मागणी होत असून यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार दिलीप वळसे-पाटील यांना मुदतबंद कार्यक्रम दिला जाईल, यावर ठोस कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात येईल, असा इशारा पाबळ येथे झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आला. त्याचबरोबर येत्या काळात येथील पाणीप्रश्नासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला या बैठकीस पाबळ केंदूर परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रश्नासाठी आंदोलनाचा निर्णय
खेड तालुक्यातील वरुडे, पूरगाव ,कनेरसर, शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ, धामारी, खैरेनगर, कान्हूर मेसाई तसेच आंबेगाव तालुक्यातील धामणी, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी या सर्व गावात पाणी प्रश्नाविषयी जनजागृती करून प्रशासनाला पाणी प्रश्न सोडवण्यात भाग पाडण्यासाठी आंदोलनाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पाबळच्या सरपंच रोहिणी जाधव उपसरपंच संजय चौधरी, केंदूरचे माजी उपसरपंच युवराज साकोरे, भरत साकोरे, भाऊसाहेब थिटे, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी डहाळे, नामदेव जगताप, सुलभा पिंगळे, कल्याणी साकोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंदूर येथील ग्रामपंचायत सदस्य भरत साकोरे यांनी सांगितले थिटेवाडी बंधार्यात पावसाच्या पाण्याशिवाय पाणी येत नाही ते आले तर काही गावांचा विकास होणार आहे, त्यामुळे राजकीय वाद बाजूला ठेवून कायमस्वरूपी पाणी प्रश्नावर एकत्र येत आम्ही सर्व एकत्र येत आहोत.
नेत्यांनो पाणी द्या, कारणे नको
पाबळसह परिसरातील 12 गावांतील दुष्काळी परिसरातील प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार सुरेश गोरे, भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे या सर्वांना एकत्र येण्यास भाग पाडून आम्हाला फक्त पाणी हवे कारण नको, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. त्याचबरोबर दुष्काळी गावातील ग्रामसभेचे ठराव घेऊन ते ठराव या नेत्यांना देऊन त्यांना एका महिन्याची मुदत देऊन पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास मतदानावर बहिष्काराबरोबर इतर मार्गांनी आंदोलन तीव्र करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.
पाणी प्रश्न पेटणार
येत्या काळात पाण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. नुकत्याच केंदूर येथे झालेल्या बैठकीत ‘पुढाजयांना गावबंदी’ पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पाबळ येथे झालेल्या बैठकीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित झाल्याने येत्या काळात या भागातील पाणीप्रश्न चांगलाच पेटणार असल्याची चिन्ह आहे.
आमचा एकच मुद्दा आहे, आम्हाला फक्त कायमस्वरूपी पाणी पाहिजे, ते त्यांनी कुठून आणायचे, कसे आणायचे याबद्दल काही माहित नाही. या परिसरातील बाधित गावांना पाणी मिळावे, यासाठी आम्ही या गावात जाऊन ग्रामसभांचे ठराव घेणार आहोत. ते ठराव या नेत्यांना देऊन त्यांना एका महिन्याची मुदत देणार आहोत, त्यांतर त्यांना जाग आली नाही तर मतदानावर बहिष्कारासह इतर मार्गाने आमचे आंदोलन तीव्र करणार आहे.
पोपट चौधरी, ग्रामस्थ पाबळ
मी शिवसेनेचा विभाग प्रमुख असलो तरी मला गावचा प्रश्न महत्वाचा आहे. आता क्रांतीची ज्योत पेटली आहे, संपूर्ण पाबळ व केंदूर परिसरातिल तरुण एकत्र आला आहे. कारण या भागातले लोकप्रतिनिधी पाणी येईल पाणी येईल, असे म्हणून गेली कित्येक वर्षे लोकांची दिशाभूल करीत आहेत. आम्ही सर्वांना बरोबर घेत या प्रश्नावर गंभीर असून पाणीप्रश्न सुटण्यासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करू.
सोपान जाधव, विभागप्रमुख शिवसेना
थिटेवाडी बंधार्यात पावसाच्या पाण्याशिवाय पाणी येत नाही, ते आले तरच या भागाचा विकास होणार आहे, त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून कायमस्वरूपी पाणीप्रश्नावर एकत्र येत आहोत. त्यामुळे या बंधार्यात पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही वाढता संघर्ष करू, यासाठी कोणत्याही नेत्यांशी तडजोड करणार नाही.
भरत साकोरे/पांडूरंग साकोरे, ग्रामपंचायत सदस्य केंदूर राष्ट्रवादी