पाय घसरून पडला अन जिवाला मुकला : कळमसर्‍यात शोककळा

Foot slips while drawing water : Death Of Youth From Kalamsara Who Fell Into Well
पाचोरा :
पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावातील 26 वर्षीय तरुणाचा विहिरीतून पाणी काढतांना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. सोमवार, 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हरी राजू मोरे (26, कळमसरा, ता.पाचोरा) असे मृत तरुण शेतकर्‍याचे नाव आहे.

पाण्याची तहान बेतली जीवावर
हरी मोरे हा तरुण सोमवारी सकाळी 11 वाजता शेतासाठी फवारणी साठी आला होता. पाण्याची तहान लागल्याने हरी विहिरीजवळ गेला मात्र रात्रीच झालेल्या जोरदार पावसामुळे विहिरीच्या कठड्याजवळ चिखल झाल्याने त्याचा पाय घसरला व तो विहिरीत पडला. हा प्रकार शेजारील शेतात काम करणार्‍यांच्या लक्षात येताच तरुणाला तत्काळ विहिरीतून बाहेर काढण्यात आले मात्र तो पर्यंत उशीर झाल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचेवैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी हरी मोरे यास मयत घोषित केले.

कळमसरा गावात शोककळा
मयत हरीच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, दोन भाऊ असा परीवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचा असलेल्या हरीच्या मृत्यूने कळमसरा परीसरात शोककळा पसरली. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.