पारख विद्यालयात शालेय मंत्रीमंडळ निवडणूक

0

राजगुरुनगर । शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयातील चिमुकल्या मुलांची शालेय मंत्रीमंडळ निवडणूक नुकतीच संपन्न झाली. उमेदवार निवड, प्रचार, प्रत्यक्ष मतदान, निकाल व त्यानंतर प्रमाणपत्र वाटप, सत्कार या सर्व प्रक्रियेचा अनुभव मुलांनी घेतल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा कोठारी यांनी दिली. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उपक्रमाचे उद्घाटन खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजित लुणावत यांनी केले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, सचिव त्र्यंबक जोशी, संचालक प्रदीप कासवा, अ‍ॅड. संदीप भोसले, शाळा समिती अध्यक्ष विनायक दीक्षित, केंद्र प्रमुख गजानन परदेशी आदी उपस्थित होते.

भाषणकलेचा होतो विकास
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण व भाषणकला यांचा विकास होतो. या निवडणूक प्रक्रियेत चौथीमधील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला होता. या निवडणुकीला 16 उमेदवार उभे होते. यात आर्यन वरकड, अर्णव घनवट, निसर्ग भैय्ये, निसर्गा वाळुंज, दिपक राठोड, पार्थ लोंखंडे, शांभवी पाटोळे, रश्मी कुलकर्णी, ज्ञानेश दुधाळे, मृणाल जाधव हे 11 उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देण्यात आले. सचिन गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले.