पारवडी निवडणुकीत गाजतेय ‘परतफेड’

0

बारामती । परतफेड हा शब्द पारवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत चांगलाच चर्चीला जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दोन वेळा बारामतील भेट दिली. बैलगाडीत फिरले, पिठल्याचा आस्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात शिवसेना आणि भाजपा नेत्यांची अनेक कामे झाली होती. म्हणून त्यांनी बारामतीला भेट दिल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे नागरीकांनी परतफेड हा शब्द वापरला होता. अगदी अशीच परिस्थिती पारवडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेली आहे. येथे राष्ट्रवादी भाजपची परतफेड करण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार द्विधा मनस्थितीत
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास सहकार्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर अत्यंत कमी तुल्यबळ असा उमेदवार भाजपने दिला होता. याची चर्चा बारामती तालुक्यात चांगलीच रंगली होती. याविषयी एका ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानीक अर्थपूर्ण ताकद असलेल्या नेत्याने परतफेड केल्याचे चर्चेच्या ओघात सांगितले. या ओघात पहिली परतफेड केलीच आहे. आता मतदानातली दुसरी परतफेड करावयाची आहे, असे बोलल्याचे खात्रीपूर्वक समजते. त्यामुळे पारवडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा कमी तुल्यबळ असलेला कसा असेल? याविषयी आखणी सुरू आहे. जेणेकरून भाजपच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यास मदत होईल व आपली परतफेड केली जाईल, अशा विचारांचे वादळ पारवडीत सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचपदाच्या उमेदवारांची द्वीधा मनस्थिती झाली आहे.

कार्यकर्ते नाराज
राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. एका गटाच्या दाव्यानुसार अपक्ष उमेदवार द्यायचा व हाच उमेदवार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून जाहीर करायचा असाही एक मतप्रवाह आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विदर्भाच्या दौर्‍यावर असल्यामुळे स्थानिक पदाधिकारी संभ्रम अवस्थेत आहेत. मात्र या सर्व घटनेमुळे परतफेड याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातही पारवडी ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चिली जात आहे. येत्या दोन दिवसात नेमक्या काय घडामोडी घडतात. यावर बरेच काही अवलंबून आहे.

राष्ट्रवादीचे भाजपला सहकार्य?
राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका अजून स्पष्ट झाली नाही. उमेदवार अर्ज दाखल करण्याचा कालावधी दोन दिवस असल्याकारणाने अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याने भाजपच्या नेत्यास सहकार्य करण्याचे ठरविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस काय करणार? हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवीदास गावडे यांना सरपंच पदाची उमेदवारी द्यावी, असा दबाव असून रमेश बेंगारे हे प्रबळ दावेदार आहेत. रमेश बेंगारे हे जनतेतील उमेदवार मानले जातात तर भाजपच्या गोटात गोंधळ असून बंडू गावडे, तानाजी गावडे यांच्याबरोबरच माजी उपसरपंच मोहन सांगळे हे प्रबळ उमेदवार आहेत. परंतू सरपंचपदाच्या उमेद्वारीसाठी दोन्ही पक्षात चर्चा सुरू असून एकमत होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी काय घडेल याविषयी दोन्ही पक्षात खल सुरू आहे.