बारामती : बारामती तालुक्यातील पारवडी-भिगवण दरम्यानचा जिल्हा मार्ग क्रमांक 61 ची दुरवस्था झाली आहे. हा संपूर्ण रस्ता उखडला गेला आहे. या मार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. चढण असलेल्या ठिकाणी ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरला ट्रेलर खेचण्यास अवघड जाते. अशा ठिकाणी ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरच्या घर्षणामुळे मोठाले खड्डे पडलेले आहेत त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
या प्रादेशिक जिल्हा मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. परंतू ऊस वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून दुचाकी चालवणे अवघड होऊन बसले आहे. संपूर्ण रस्त्याच खड्ड्यात गेल्याने नेमका कोणता खड्डा चुकवायचा असा प्रश्न चालकांना पडत आहे. या रस्त्यावर अवजड वाहन आल्यास मग मात्र मोठी गैरसोय होते. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.