ममता पेट्रोल पंपासमोरील घटना ; ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक, एक जखमी
पारोळा- ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टाटा कंपनीच्या चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार वृद्ध जागीच ठार झाला तर अन्य एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ममता पेट्रोल पंपासमोर घडली. या प्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
भरधाव चारचाकीच्या धडकेने मृत्यू
भागवत भोमटू सपकाळे (70, चोपडा) हे राजदूत (एम.एच.19 ए.एक्स.9177) ने अमळनेरमार्गे चोपडा जात असताना चारचाकी (टाटा एस- एम.एच.04 ईबी 9778) ने जोरदार धडक दिल्याने भागवत सपकाळे यांचा मृत्यू झाला तर पाठिमागे बसलेले जगन्नाथ विनायक पाटील (शिंदेवाडा, चोपडा) हे जखमी झाले. पाटील यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार करण्यात आले. या प्रकरणी जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चारचाकी चालक भीमराज हिरामण पवार (कुंझर, ता.चाळीसगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.