महापालिकेचा निर्णय
पुणे : पुण्यात रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून ही मंजुरी देण्यात आली आहे. दुचाकीसाठी तासाला 2 ते 4 रूपये तर चारचाकी गाडीसाठी 10 ते 20 रूपये तासाला मोजावे लागणार आहेत.महापालिकेने संपूर्ण शहरभर पे अॅण्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहराचे वेगवेगळे झोन करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि क झोनमध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहे. दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी 2 रूपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी 4 रूपये आकारण्यात येणार आहेत.
स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी
चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी 10 आणि 20 रूपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. रात्री पार्किंगसाठी रात्री 10 ते सकाळी 8 असा कालावधी असेल. 10 रूपये एका दिवसासाठी आकारण्यात येतील. शुल्क मोजणीचा प्रस्ताव पुणे महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.