पार्किगसाठी जादा रक्कम मागणार्‍या दोघांना अटक

0

मुंबई – पार्किंगसाठी जादा रक्कम मागून फसवणुक करणार्‍या एका दुकलीस काल आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. खलील बिस्मिल्ला शेख आणि मुक्तार अहमद अब्दुल गफार शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी त्यांना 2 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यांत आरटी कार्पोरेशनचे मालक आतिक, मॅनेजर अश्रम, रईस, सलीम आणि युसूफ असे पाचजण वॉण्टेड असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. क्रॉफर्डमार्केट येथील डी. एन. रोडवर महानगरपालिकेने आरटी कार्पोरेशनला पार्किंगचे एक कंत्राट दिले होते. मात्र या कंपनीकडून तिथे पार्किंगसाठी येणार्‍या चालकांकडून जादा रक्कम काढून त्यांची फसवणुक केली जात असल्याची तक्रारी आझाद मैदान पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी तिथे भावेश नरपत जैन आणि अमीत अरुण शेठ हे त्यांची कार पार्क करण्यासाठी आले होते. यावेळी तिथे असलेल्या मुक्तारने त्यांच्याकडे एक तासांसाठी शंभर रुपये आणि चार तासांसाठी अडीच रुपयांच्या पार्किंगची रक्कम देण्यास सांगितले होते. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी विरोध केला होता. त्यांच्यातील हा वाद सुरु असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना हा प्रकार निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आझाद मैदान पोलिसांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. या माहितीनंतर आझाद मैदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना हा प्रकार समजला. त्यानंतर भावेश जैन आणि अमीत शेठ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच खलील शेख आणि मुक्तार शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात ही टोळी गेल्या कित्येक वर्षांपासून बोगस पावती देऊन अनधिकृतपणे जादा रक्कम वसुल करुन दुचाकी आणि चारचाकी पार्किंग करीत होते. कोणी त्यांना जादा रक्कम दिले नाहीतर ही टोळी कारचे स्पेअर पार्ट चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक वाहनांचे पार्ट चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपी वॉण्टेड असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.