पार्थ पवार प्रकरणावर अजित पवारांचे ‘नो कॉमेंट’

0

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकारणात विविध चर्चेला उधाण आले आहे. वडील उपमुख्यमंत्री अजित पवार यावरून नाराज असल्याच्या चर्चा देखील होत आहे. मात्र यावर अद्याप अजित पवारांचे मौन आहे. त्यांनी यावर भाष्य केलेले नाही. दरम्यान आज रविवारी १६ रोजी त्यांना माध्यमांनी पार्थ पवार प्रकरणावर विचारले असता, त्यांनी मला माझे काम करु द्या अशा शब्दात अजित पवारांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. सध्या अजित पवार आणि पार्थ पवार बारामतीत आहेत. आजोबा शरद पवार यांनी जाहीररित्या नातू पार्थला अपरिपक्व असल्याचे म्हटल्याने पार्थ पवार नाराज असून तो वेगळा निर्णय घेण्याच्या स्थितीत असल्याच्याही चर्चा आहे.

शनिवारी पार्थ पवार यांनी काका श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. रविवारी सकाळपासून अजित पवार बारामतीतील विकास कामांची पाहणी करत आहेत. नियोजित दौऱ्याप्रमाणे अजित पवार बारामतीतील स्थानिक नागरिकांना भेटत असतात. पार्थ प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मात्र अजित पवार यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.