जळगाव – पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी एफडी करतात का? असा प्रश्न विचारून एक प्रकारे शेतकर्यांची टिंगलच केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना केला. पालकमंत्र्यांनी असे नवे संशोधन कुठून आणले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी काल जिल्ह्यात दुष्काळी दौरा केला. या दौर्यात त्यांनी ९ गावांचे धावते दौरे केले. तसेच खरीप आढावा बैठकीत उत्सुकतेपोटी पालकमंत्री ना. पाटील यांनी ‘असे किती शेतकरी आहेत, जे कर्ज घेतात आणि इतर बँकेत एफडी करतात?’ असा प्रश्न अधिकार्यांना केला होता. या प्रश्नाचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले असुन राजकीय वर्तुळातुनही पालकमंत्र्यांविरूध्द टिकेची झोड उठविली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळी दौरा करणे हे नवलच म्हणावे लागेल. चाळीसगावहून सुरू झालेल्या या दौर्यात पालकमंत्र्यांनी प्रत्येक गावाला केवळ दहा मिनीटे भेटी दिल्या. या दहा मिनीटाच्या भेटीत त्यांनी कोणत्याही शेतकर्यांशी संवाद साधुन दुष्काळाची परीस्थीती जाणून घेतली नाही. याऊलट मंगरूळ येथे जाऊन त्यांनी टाळ वाजविला.
जिल्हा दुष्काळाने होरपळत असतांना पालकमंत्री मात्र टाळ वाजविण्यात दंग आहेत. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन जिल्ह्यातील शेतकर्यांची एकप्रकारे टिंगलच केली असल्याचा आरोप आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे.
राज्यात ४४ जागा हा ‘विनोद’च
पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीला ४४ जागा मिळतील असा दावा केला आहे. या दाव्याचा देखील आमदार डॉ. सतीश पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, पालकमंत्र्यांनी सांगितलेल्या ४४ जागा हा ‘विनोद’च म्हणावा लागेल. अकलेचे तारे तोडण्याचे हे काम असल्याचाही टोला त्यांनी लगावला.