नवी सांगवी : आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आई-वडील, गुरुजनांचा आदर करण्यास संस्कृती शिकवते. मात्र, आज मुलांचा आपल्या पालकांसोबत संवाद हरविला आहे. त्यामुळे मुले वाममार्गाकडे जात आहेत. कोणतेही संकट किंवा अडचण असेल तर मुलांनी प्रथम आपल्या आई-वडिलांशी संवाद साधला पाहिजे. त्यातून निश्चितच मार्ग निघतो. आपल्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. त्यांचा आदर करा, असे आवाहन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. नवी सांगवी येथील राही-माई प्रतिष्ठानच्या वतीने मल्हार गार्डन येथे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉ. देखणे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, सुदाम ढोरे, शिवलिंग किंणगे, मनोहर ढोरे, संगीता चौधरी, आशा गायकवाड, शुभांगी जोशी, रामकृष्ण राणे, साई कोंठरे, दत्ता येनपुरे, गणेश काची, आप्पा ठाकर, देवा ढोरे, सतीश कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अंगी नम्रता बाळगा
डॉ. रामचंद्र देखणे पुढे म्हणाले की, पालकांबरोबर सुसंवाद नसल्यामुळे हजारो मुले वाममार्गाकडे जात आहेत. मुलांनी शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करताना अंगी नम्रता बाळगावी. शिक्षण घेताना विविध कला अवगत कराव्यात. अनेक कौशल्य स्वत:मध्ये विकसित करावे. विद्यार्थ्यांनी आपली भारतीय परंपरा, संस्कृती जपली पाहिजे. अंगी मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळते. त्यामुळे खूप कष्ट करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा, असे आवाहन त्यांनी केले.
200 विद्यार्थ्यांचा सत्कार
या कार्यक्रमात दोनशेहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा शब्दकोश, स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बा. रा. घोलप शाळेच्या शिक्षिका शारदा सस्ते यांचा आदर्श शिक्षिका म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. नामदेव तळपे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर जवाहर ढोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला परिसरातील पालकवर्ग व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.