संत तुकाराम महाराज पालखी मार्ग भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
दौंड : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र सरकारच्या सडक परिवहन मंत्रालयाने हाती घेतले असून पालखी मार्गाची भूसंपादन प्रकिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या मार्गास संपादित करण्यात येणार्या जमिनीचा मोबदला अद्याप जाहीर न झाल्यामुळे संभ्रमावस्थेतील शेतकरी सरकारविरोधी भूमिकेत आहेत. शेतकरी तीव्र आंदोलन उभारण्याच्या तयारीत असून, पाटस, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, उंडवडी, खराडेवाडी, उडंवडी क. प. बारामती बाह्य वळणासाठी राष्ट्रीय महामार्ग 65च्या चौकापासून सुरू होणार्या पालखी मार्गाची भूसंपादन प्रकिया अंतिम टप्प्यात आहे.
या कामासाठी पुणे जिल्ह्यासह, सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात येणार आहेत; परंतु सरकारच्या धोरणात्मक वृत्तीमुळे मोबदला दर निश्चित झालेला नाही, त्यामुळे बाधित शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत, त्यामुळे आगामी काळात विकासकामांनाही खीळ पडण्याची शक्यता आहे.
दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, हिंगणीगाडा आणि वासुंदे या गावांतील जमिनी संपादित होणार आहेत. भूखंड संपादित करण्यात येणार्या मोकळ्या जमिनीचे विवरण सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने 4 एप्रिल अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केले होते. सरकारच्या वतीने दिनांक 3 मे उपजिल्हाधिकारी सुनील गाढे भूसंपादन क्र. 11 यांनी वासुंदे येथे बाधित शेतकर्यांसमवेत सकारात्मक चर्चा केली होती.
जमीन संपादनाचे काम उपविभागीय अधिकार्यांकडे
संपादित जमिनीचा मोबदला नक्कीच चांगला मिळेल आणि नॅशनल हायवेला नवीन भूसंपादन अॅक्टनुसारच संपादन होणार आहे, असे आश्वासन उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी दिल्यामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते; परंतु त्यानंतर हे संपादनाचे काम काही कारणास्तव उपविभागीय अधिकारी बारामती यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
प्रतीगुंठा आठ लाख रुपये आणि महामार्गामध्ये जाणार्या दीर्घायुष्यी झाडाला प्रती झाड पंधरा हजार मोबदला मिळण्याची शेतकर्यांची मागणी आहे. दर निश्चितीचे काम सुरू आहे, प्रत्येक गावाला वेगवेगळे दर आहेत. जमिनी ताब्यात घेतल्यानंतर शेतकर्यांना मोबदला दिला जाईल, असे बारामती उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी कळविले आहे.