पालखी मार्गासाठी 1,953 कोटी

0

बारामती । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पाटस वासुंदे, बारामती, इंदापूर, अकलूज, मलखांबी, बोंडले असा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा राष्ट्रीय मार्ग म्हणून नव्याने मंजूर झाला आहे. या नवीन राष्ट्रीय महामार्ग 965 जी असा आहे. या महामार्गाची लांबी 140 किमी असून यासाठी 1953 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.

पाटस ते अकलूज हा मार्ग चौपदरी होणार आहे. दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा मार्ग आहे. विशेषत: पुण्यावरून बारामतीला जाण्यासाठी या मार्गाचा चांगलाच उपयोग होणार आहे. अकलूजच्या नागरिकांना सध्या इंदापूरमार्गे पुण्याला जावे लागते. या नव्या महामार्गामुळे अंतर 50 किमी ने अंतर कमी होणार असून अकलूजकरांचा पाऊण तास वाचणार आहे. या मार्गालगतच्या शेतकर्‍यांची जमीन हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य प्रमाणात व बाजारभावाने भाव मिळावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमध्ये जोर धरू लागली आहे. ही आमच्या शेतीची किंमत महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी मिळावी, असेही या शेतकर्‍यांनी सांगितले.

रखडलेला बारामती-फलटण मार्ग मार्गी
केंद्रिय रस्ते महामार्ग व जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि. 27) पुणे पॅकेजचे प्रस्तावित प्रकल्प जाहीर केले आहे. ही कामे लवकरच सुरू होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान बारामती-फलटण हा अनेक वर्ष रखडलेला राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग 965 जी मध्ये समाविष्ट केल्यामुळे या मार्गावरील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. हा मार्ग अनेक वर्षापासून अपूर्णावस्थेत आहे. या मार्गावरील अपघात 27 जणांना जीव गमवावा लागला आहे. या मार्गासाठी नागरिकांनी अंदोलनेही केली. मात्र हा मार्ग दुर्लक्षितच राहिला होता.

300 कोटी मंजूर
बारामती-फलटण 25 किमीचा मार्ग असून यासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे. बारामती व फलटण या अन्नधान्याच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. तसेच राशिन, कर्जत, भिगवण, बारामती, फलटण, सातारा हा मार्ग रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावर मराठवाड्यातून सातारा, कोल्हापूर जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र, सातत्याने या मार्गाकडे दुर्लक्षच करण्यात आले. शिरवळ-फलटण या मार्गाचे काम चार वर्षापूर्वीच पुर्ण झाले आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण
बारामतीकरांच्या दृष्टिने पुणे पॅकेजमध्ये अहमदनगर-बारामती हा राज्यमहामार्ग याच पॅकेजमध्ये मंजूर झाला आहे. ही एक समाधानाची बाब आहे. 93.800 किमी. चा हा रस्ता दुपदरी असून आता चार पदरी होणार आहे. यासाठी 522.85 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अहमदनगर ते दौंड या रस्त्याची प्रचंड खराब अवस्था असून मोठाले खड्डे पडलेले आहेत. याही रस्त्यावर सातार्‍याला जवळचा मार्ग म्हणून मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गामुळे मालवाहतुकीस चांगलीच वाढ होईल. बारामतीपासून नगर, सातारा व इंदापूरहून सोलापूर महामार्गाला जाण्यासाठी तसेच बीडला जाण्यासाठी चांगले दर्जेदार चार पदरी रस्ते तयार होतील, अशी नागरिकांची आशा आहे.