पालघर । पालघर जिल्ह्यातील भ्रष्ट व्यवस्थेपुढे देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणपणाला लावून लढणार्या सैनिकांवर आमरण उपोषण करण्याची नामुष्की येत असेल तर आपल्या देशाची ही खेदाची बाब म्हणावी लागेल. ठाणे जिल्हा माजी सैनिक हितकारी संस्था पालघर यांचे वतीने दिनांक ११ सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव तायडे, सचिव सुरेश आवटे व इतर सर्व माजी सैनिक सदस्यांच्या उपस्थित आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी तसेच शासन दरबारी मिळणारी अपमानास्पद वागणूक व शासन सेवा बजावत असलेल्या माजी, आजी सैनिकांच्या पत्नींच्या बाबतीत विशेष सवलती व बदल्यांबाबत वेळोवेळी होत असलेल्या शासन आदेशांना केराची टोपली दाखवून आर्थिक हितसंबंध असलेल्यांची त्या जागी वर्णी लावली जात असून या बाबत तक्रारी व माहिती राज्याच्या राज्यपालांसह सर्व संबंधित विभाग आणि विभागप्रमुखांना गेली वर्षानुवर्षं देऊनसुद्धा आणि त्याचा पाठपुरावा करून देखील त्यावर कोणतीही समाधानकारक कारवाई न करता उलट त्यांनाच अपमानास्पद वागणूक दिली जाते.
उपोषण ही खेदाची बाब
आपल्याच न्याय हक्कांसाठी त्यांच्यावर आमरण उपोषण व मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याची वेळ येते ही खरोखरच खेदाची बाब आहे. माजी सैनिक सण २०१२ पासून आपल्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी व जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यासह ते सांगतील त्या त्या ठिकाणी खेटा मारत आहेत. परंतु, त्यांना आजपर्यंत कोणतेच समाधान कारक उत्तर मिळाले नाही. उलट त्यांना कागदी घोड्यांच्या राजकारणात घाण्याच्या बैला प्रमाणे फिरवतच ठेवलेले आहे. या शासनाच्या उदासीन व भ्रष्ट धोरणाविरोधात आता लोकशाही मार्गाने या माजी सैनिकांनी सहकुटुंब आमरण उपोषणाचे हत्यार हाती घेतले आहे. माजी सैनिक आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकीणी आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय व अंमलबजावणी होत नाही तो पर्यत हे उपोषण संपणार नाही असे या समघटनेचे अध्यक्ष व सचिव आणि सर्व माजी सैनिकांनी सांगितले आहे.