पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्‍नांवर मनसेने केला हल्लाबोल

0

मनोर । रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेतून प्रवास करणार्‍या पासधारकांना आरक्षित डब्यातून प्रवास करता येणार नाही असे फर्मान काढले आहे व आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही अशा प्रकारचा स्टॅम्प त्यांनी पासवर मारण्यात आला आहे, याविरोधात पालघर जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष व उद्वेक निर्माण झाला असून, या असंतोषाला वाट मोकळी करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली पालघर रेल्वे स्टेशन प्रबंधक कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला त्यावेळी पालघर रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना त्यांच्या खुर्चीवरून उठवून खाली बसवून जाब विचारण्यात आला.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांबाबतीत अन्यायकारक घेतलेला निर्णय ताबोडतोब माघे घेऊन प्रथमतः रेल्वे प्रवासी पासधारक डब्यांची संख्या वाढवावी, पालघर जिल्ह्यातील प्रत्येक स्टेशनवर अद्ययावत सोई सुविधा पुरवाव्यात व नंतरच प्रवाशांना विश्‍वासात घेऊन कुठलाही निर्णय घ्यावा, असे निक्षून बजावण्यात आले त्यावर स्टेशन प्रबंधक यांनी डी. आर. एम. कार्यालयाशी संपर्क साधून शिष्टमंडळाचे बोलणे करून दिले. यावर मनसेचे कुंदन संखे यांनी डीआरएम कार्यालयाशी बोलताना सदर रेल्वे प्रवाशांबाबत काढलेला अन्यायकारक फतवा रद्द करावा, अशी मागणी केली. त्यावर डीआरएम कार्यालय व स्टेशन प्रबंधक यांनी जोपर्यंत याबाबत डीआरएम कार्यालयसोबत संयुक्तिक बैठक होत नाही तोपर्यंत पासधारकांची कुठल्याही प्रकारे अडवणूक केली जाणार नाही.