धुळे (ज्ञानेश्वर थोरात) :- सर्वसामान्य नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आग्रह धरणारे पोलीस कर्मचारीच आपल्या दुचाकींवर नंबरप्लेट लावत नसून, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करतांना दिसत आहेत. पोलीस दलातील 40 टक्क्यांहून अधिक कर्मचार्यांच्या वाहनांवर कधी नंबर प्लेट नाहीत. तर काही वाहनावर फॅन्सी व नियमबाह्य नंबर प्लेट आहेत. एरव्ही सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक पोलीस मात्र पोलिसांच्या वाहनांकडे कानाडोळा करताना दिसतात. जिल्ह्यात 2 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी असून, 80 ते 90 टक्के पोलीस कर्मचार्यांकडे दुचाकी वाहने आहेत. धुळे येथील पोलीस मुख्यालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पोलीस कर्मचार्यांसाठी पार्किंगची सोय आहे. तेथे सुमारे दहा टक्के वाहने सर्वसामान्य नागरिकांची असतात. पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर नजर टाकली असता 35 टक्क्यांहून अधिक दुचाकी विना नंबरच्या तसेच नंबरप्लेट फॅन्सी असलेल्या आढळतात.
पुढील व मागील नंबर प्लेटसाठी विशिष्ट आकार असताना पोलिसांनी मागील बाजूस असलेल्या पंख्यावर छोटी फॅन्सी नंबरप्लेट लावण्यात धन्यता मानली आहेत. काहींनी फुटबॉलचे चित्र टाकले आहेत, तर कोणी ‘पोलीस’ अशी ठसठशीत अक्षरे काढली आहेत. पोलिसांबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यही फॅन्सी नंबरप्लेट दुचाकीवर लावून धडधडीत नियम तोडत असल्याचे चित्र जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या वसाहतीत पहायला मिळत आहे. रस्त्यावर धावणार्या गाडीला आरटीओ विभागाचा रजिस्ट्रेशन नंबर असणे बंधनकारक आहे. मग या नियमाचे बंधन फक्त सामान्य नागरिकांनाच आहे का? पोलिसांना नाही का? असा प्रश्न नागरिकांकडून नेहमीच उपस्थित होतो. रस्त्यावर धावणार्या गाडीला आरटीओ विभागाचा रजिस्ट्रेशन नंबर असणे बंधनकारक आहे. मग असे असताना ही गाडी डीलर्सच्या शोरूममधून विना नंबर बाहेर कशी काय पडते? शोरूममधील स्टाफ ‘टेम्पररी पासिंग’च्या नावे गाडी ही मालकाला देतो. त्यानंतर या गाडीला रजिस्ट्रेशन नंबर मिळण्यासाठी 15 वा त्याहून अधिक दिवस वाट पाहावी लागते. यादरम्यान, वाहतूक पोलिसाने गाडी पकडली की नाहक भुर्दंड भरावा लागतो. एकूणच गाडी नंबरसह रस्त्यावर धावावी, ही जबाबदारी शोरूमचीच आहे. मात्र, पोलीस आणि शोरूम यांच्यात साटेलोटे असल्याने ते रजिस्ट्रेशन नंबर देण्यास विलंब करतात. आणि त्याचा भुर्दंड सामान्य वाहनचालकांना सोसावा लागतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना बघता गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.
जिल्ह्यात जुगार, मटका, चोर्या, घरफोडी, खून, व्यापार्यांची लुट यासारखे गंभीर गुन्हे भर दिवसा सर्रासपणे होत असताना जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नसल्या सारखे सर्वत्र चित्र आहे. दरम्यान पोलीस प्रशासन वाढत्या गुन्हेगारीला संपुष्टात आणण्यासाठी कसरत न करता वाहतूक नियम तोडणार्या वाहनांमागे मिलो धावतांना दिसत आहेत. आणि ते ही स्वतः वाहतूक नियमाची पायमल्ली करून….!