पालिका इमारतीचा धोका कायम!

0

भुसावळ । येथील नगरपालिका इमारतीची अतिशय दयनिय अवस्था झालेली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी पालिका कार्यालयाचे स्थलांतर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. राज्यात घाटकोपर तसेच आमदार निवासाची घटना ताजी असताना पालिका प्रशासन मात्र या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. पालिकेचा हलगर्जीपणा कर्मचार्‍यांच्या जीवावर उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हि धोकादायक इमारत त्वरीत खाली करण्यात यावी अशी मागणी जनाधार विकास पार्टीच्या नगरसेविका संगिता देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांची मंगळवार 1 रोजी भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत करुन दिले.

जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष
नगरपालिकेची मुख्य इमारत हि ब्रिटीशकालीन तर समोरील नगराध्यक्ष दालनाची इमारत हि 37 वर्ष जुनी आहे. सद्यस्थितीत या दोन्ही इमारतींची अवस्था अतिशय दयनिय झालेली आहे. नविन इमारतीच्या छताचे प्लास्टर वारंवार कोसळत असते. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी पालिकेत भेट दिली असता त्यांनी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन हि इमारत खाली करण्याच्या सुचना दिल्या होत्या. ब्रिटिशकालीन जीर्ण इमारतीची स्थापत्य स्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने जुलैला स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेतले. या ऑडिटचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

पावसामुळे भिती वाढली
घाटकोपरमधील इमारत कोसळून झालेली दुर्घटना तसेच आमदार निवासस्थानातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाने हि बाब गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. पालिका इमारत जीर्ण झाली असून रिमझिम पावसामुळे पडझड झालेल्या भागांमध्ये पाणी शिरुन मोठी आपत्ती कोसळण्याची भीती आहे. याठिकाणी कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. तसेच या भागात रेल्वे स्थानक व बसस्थानक असल्यामुळे वाहतुकीची वर्दळ असते. सध्या पावसाळा सुरु असल्याने पावसाच्या मार्‍याने काही दुर्घटना झाल्यास यात जीवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रांतांनी आदेश द्यावे
पालिका इमारतीची झालेली दयनिय अवस्था लक्षात घेता प्रांताधिकार्‍यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांमध्ये समन्वय साधून इमारत तात्काळ स्थलांतराचे आदेश देण्याची मागणी नगरसेविका देशमुख यांनी केली आहे. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी पालिका कार्यालयाचे स्थलांतरण करण्यासाठी सूचना केल्या होत्या. पालिकेची नवीन इमारत तत्काळ उभी करावी, असे सांगून त्यांनी गांभीर्य व्यक्त केले होते. त्यामुळे इमारतीचा मुद्दा अत्यंत जिव्हाळ्याचा बनला आहे.