पालिका घोटाळ्यात शेलारांचा सहभाग

0

मुंबई । मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण समिती आणि सुधार समिती सातत्याने भाजपकडे राहिली आहे. या सुधार समितीच्या माध्यमातून जनतेसाठी राखीव असलेले भूखंड हेरुन त्यावरील आरक्षण उठविण्याचे व ते बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम भाजपने केले आहे. गेल्या 22 वर्षात या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात मुंबई भाजप अध्यक्ष अशिष शेलारांचा सहभाग असल्याचा गंभिर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात घोटाळा
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सुधार समितीचे चॅपियन आहेत. नगरसेवक असताना शेलार यांनी सुधार समिती कधीही सोडली नाही. आताही या समितीचे सुत्रधार स्वतः आशिष शेलारच आहे. काही दिवसांपुर्वी आशिष शेलार यांच्या वांद्रे मतदारसंघात एल्को मार्केट समोरचा हिल रोड येथील भूखंड आरक्षण मुक्त केला. यामध्ये जवळपास तीन ते चार हजार स्क्वेअर मीटरचा जनतेसाठी आरक्षित असलेला भूखंड आशिष शेलार यांच्या माध्यमातून आरक्षण मुक्त करण्यात आला. यासाठी सुधार समितीच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला असून या घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार आशिष शेलार हेच आहेत. जे आशिष शेलार स्वतः घोटाळे बहाद्दर आहेत ते पारदर्शक कारभार करण्याची अट ठेवत आहेत ही बाब अत्यंत हस्यास्पद असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष शिवसेनेशी युती करताना पारदर्शक कारभार ही एक अट असल्याचे सागंत आहेत, मात्र गेली 22 वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात घोटाळा झाला आहे. महापालिकेतील प्रत्येक समितीत आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे शिवसेनेने घेतलेल्या प्रत्येक निर्णयात व त्यातून झालेल्या गणवेश घोटाळा, टॅब घोटाळा, कचरा घोटाळा, टँकर घोटाळा, नालेसफाई, रस्ते घोटाळा या सगळ्या भ्रष्टाचारात भाजप देखील वाटेकरी असल्याची टीका नवाब मलिक यांनी यावेळी केली.