पुणे । महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बालकांसाठी अतिदक्षता विभाग नसल्याने अत्यवस्थ असलेल्या नवजात बालकांना उपचार मिळत नाहीत. परिणामी बालक दगावण्याची शक्यता निर्माण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहरात पाच ठिकाणी नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दोन अतिदक्षता विभाग चालू वर्षी सुरू केले जाणार आहेत. यासाठी 2 कोटी 90 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात एका संबंधीत संस्थेशी सामंजस्य करार करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
खासगी रुग्णालयांचा आधार
पुणे महापालिकेच्या 18 प्रसुतिगृहांपैकी फक्त कमला नेहरू रुग्णालयातच नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. त्यामुळे नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांचा किंवा ससून रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. शहरातील नागरिकांची ही अडचण विचारात घेऊन महापालिकेचे सोनवणे प्रसुतीगृह, येरवड्यातील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय, शिवाजीनगर येथील डॉ. दळवी प्रसुतीगृह येथे नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्याचा आणि कमला नेहरू रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेला अतिदक्षता विभाग अद्यायवत करणे आवश्यक आहे.
आर्थिक मदत
सीएसआर अंतर्गत फिनोलिक्स इंडस्ट्रीज लि. आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी अतिदक्षता विभागासाठी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी दोन्ही संस्थांनी प्रत्यक्ष रुग्णालयांना भेट देऊन आपला अहवाल तयार केला आहे. वरील चारही रुग्णालयात सिव्हील विषयक कामे, वैद्यकीय उपकरणे, कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे.
यंदा दोन ठिकाणी विभाग करणार सुरू
या चार रुग्णालयांपैकी सोनवणे रुग्णालय आणि येरवडा येथील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालयात चालू आर्थिक वर्षामध्ये नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात दोन्ही संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची परवानगी मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.