पालिका शाळांच्या ‘पालकत्वा’ची जबाबदारी अधिकार्‍यांवर

0

आयुक्तांचे 139 अधिकार्‍यांना आदेश; 287 शाळा असून 1 लाख विद्यार्थी

पुणे : आपल्या घराच्या परिसरातील शाळांचे महापालिकेच्या विभाग प्रमुखांनी पालकत्व घ्यावे, तसेच दैनंदिन कामकाजातून वेळ काढून या शाळांना भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभाग प्रमुखांसह, सहायक आयुक्तांना केले होते. मात्र, एकाही अधिकार्‍याकडून याला प्रतिसाद देण्यात न आल्याने महापालिका आयुक्तांनी थेट 139 अधिकार्‍यांवर पालकत्वाची जबाबदारी टाकली आहे. त्यात सर्व विभाग प्रमुखांसह, उपायुक्त, सहायक आयुक्त, निरीक्षकापासून ते कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. शाळांचा दर्जा वाढावा, मुलांना आवश्यक सोयीसुविधा तातडीने मिळाव्यात आणि गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने आयुक्तांनी मागील महिन्यात घेतलेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत याबाबत सूचना केल्या होत्या.

महापालिकेच्या 287 शाळा असून 1 लाख विद्यार्थी आहेत. मात्र, शाळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे. या ठिकाणच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय यंत्रणा असली तरी त्यांच्याकडून त्या सुविधा वेळेवर दिल्या जातात, असे नाही. तसेच शाळा आणि रुग्णालयांना आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत का? याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत अधिकार्‍यांना आपल्या निवासस्थानाजवळील शाळांचे पालकत्व घेण्याचे आवाहन केले होते. दिवसातून वेळ काढून एकदा या ठिकाणी अधिकार्‍यांनी जावे, तसेच सोयीसुविधांची पाहाणी करावी. तसेच, काही सोयीसुविधा अथवा प्रशासकीय यंत्रणा अपूर्ण असल्यास त्याची माहिती आरोग्य विभाग व शिक्षण विभागास व्हॉट्स अ‍ॅपद्वारे कळविण्यात यावे, असे आयुक्तांनी आवाहन केले होते. आयुक्तांनी आढावा बैठक 6 सप्टेंबर रोजी घेतली होती. यावेळी या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दीड महिन्यांत कोणतेही अधिकारी पुढे आले नाहीत, त्यामुळे आयुक्तांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाने थेट आदेश काढून अधिकार्‍यांवर ही जबाबदारी दिली आहे.