पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देणार हार्मोनिअम, तबला, ढोलकीचे शिक्षण!

0
सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण होऊन कला-गुणांना मिळणार वाव 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी आनंददायी शिक्षण अंतर्गत ‘गीत मंच’ उपक्रम राबविला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक वेगळी कला जोपासता येणार आहे. तसेच भाविष्यात उत्तम वादक यामुळे उपलब्ध होणार आहेत. ही सुवर्णसंधी मिळाल्याने महापालिका विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या कार्यक्षेत्रात काम करता येणार आहे. गायन, वादन हे खर्चिक असल्यामुळे गरीब घरातील विद्यार्थ्यांना याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये कला गुण जोपासले जाणार आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये टप्प्या-टप्प्याने कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तसेच, शालेय कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही, या अटीवर शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे, असे शिक्षण समितीने स्पष्ट केले आहे.
पारंपरिक गीतांचा सराव  
आनंददायी शिक्षण अंतर्गत गीत मंच उपक्रमात विद्यार्थ्यांकडून प्रार्थना, समूहगीत, पोवाडा, कथाकथन, स्फूर्तीगीते यासारख्या पारंपरिक गीतांचा सराव करुन घेतला जाणार आहे. यामध्ये, महापालिका शाळांमधील गायन क्षेत्रात जाधववाडी शाळेतील सुरेश मिसाळ व निवेदक क्षेत्रात शैलेजा गायकर, हार्मोनिअमध्ये पिंपळे निलख शाळेतील धर्मेद्र भांगे हे शिक्षक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे धडे देणार आहेत. शिक्षणातून मुलांना आनंद मिळाला पाहिजे. केवळ निरस अध्यापनातून विद्यार्थी घडणार नसून विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक, भावनिक विकास होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात हार्मोनिअम, तबला, ढोलकी या साधनांचा वापर करुन विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेतला जाणार आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास गरजेचा
या उपक्रमाचे संयोजक मिसाळ म्हणाले की, शिक्षणातून मुलांना आनंद मिळाला पाहिजे. केवळ निरस अध्यापनातून विद्यार्थी घडणार नसून विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक, भावनिक असा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात हार्मोनिअम, तबला, ढोलकी, या साधनांचा वापर करुन विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेतला जाणार आहे. काही गीतांसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टिमचीही मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. ही सगळी महागडी शिक्षण पद्धती आहे. गरीब घरातून येणार्‍या महापालिकेच्या शाळेतील मुलांना याचे प्रशिक्षण घेणे परवडत नाही. त्यामुळे जर हे प्रशिक्षण सुरू केले तर मुलांना एक वेगळी कला आत्मसात केल्याचा आनंद मिळेल.