पालिका सुरू करणार निवासी रात्र-शाळा

0

पुणे । रस्त्यावरील साडेदहा हजार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या मुलांसाठी महापालिकेच्या 18 बंद असलेल्या शाळांमध्ये निवासी रात्रशाळा सुरू करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटींचा खर्च येणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील रस्त्यांच्या परिसरात तब्बल 10,500 मुले रस्त्याच्या कडेला निवारा घेत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

शहरातील रस्त्यांवर रात्र काढणार्‍या तब्बल साडेदहा हजार मुलांच्या निवार्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेकडून हैद्राबाद येथील रेनबो संस्थेच्या माध्यमातून पालिकेच्या बंद असलेल्या शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या मुलांसाठी सीएसआरअंतर्गत बजाज फिनसर्व कंपनीकडून खर्च केला जाणार आहे. मात्र, त्याची पुढील देखभाल महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी ही जबाबदारी हैद्राबाद येथील रेनबो संस्थेस देण्यात येणार असून त्यासाठी पुढील 5 वर्षासाठी दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

निवार्‍याचीही समस्या लवकरच सुटणार
रस्त्यावरील मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी हा महत्वाचा प्रकल्प आहे. यात केवळ त्यांचे शिक्षणच नाही तर त्यांच्या निवार्‍याची समस्याही सुटणार आहे. त्यामुळे या मुलांसाठी ही अभिनव योजना ठरणार आहे. अशा प्रकारची शाळा उभारणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.