गत वर्षांपेक्षा तीन लाख 65 हजारांचे जादा मिळणार उत्पन्न
भुसावळ- भुसावळ पालिकेच्या बाजार मक्त्यासाठी गुरुवारी पालिकेच्या सभागृहात झालेल्या सभेत ओपन लिलाव बोली लावण्यात येवून 38 लाख 65 हजारांना यंदाचा बाजार मक्ता देण्यात आला. गत वर्षांपेक्षा तीन लाख 65 हजार रुपये या लिलाव मक्त्यातून पालिकेला जादा उत्पन्न मिळणार आहे. ओपन बोलीत तीन ठेकेदारांनी सहभाग नोंदवला. पीठासन अधिकारी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मंगला आवटे यांच्यासह स्थायी समितीच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती. दरवर्षी पालिकेकडून बाजार मक्त्याचा लिलाव केला जातो व या माध्यमातून मक्तेदार दररोजची मार्केट फी आदींच्या माध्यमातून पालिकेकडे महसूल जमा करतो. गतवर्षी बाजार मक्त्याची किंमत 35 लाखांवर गेली होती मात्र यंदा ती तब्बल तीन लाख 65 हजार रुपयांची वाढल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.