शिक्षण समितीचा विषय लांबणीवर
पिंपरी : विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा 11 जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पीसीएमटीचे माजी अध्यक्ष सुरेश चोंधे, दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर, ज्येष्ठ गायक अरुण दाते, आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय, भिगवण येथील अपघात मृत्यू झालेल्या निगडी येथील गायकवाड कुटुंबीयांना, उत्तरप्रदेशमधील वादळात मृत्यू झालेल्यांना सभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. नगरसेवक विलास मडेगिरी यांनी श्रध्दांजली वाहून सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला सागर आंगोळकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मे महिन्याची 11 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
आजच्या महासभेत शिक्षण समितीची स्थापन करून नऊ नगरसेवकांची निवड करण्यात येणार होती. ‘पार्किंग’ पॉलिसीच्या धोरणाला मंजुरी देण्याचा विषय होता. तसेच बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्या जागेची किंमत म्हणून पालिका संरक्षण विभागाला 25 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महासभेसमोर होता. मात्र सभा तहकूब केल्याने 11 जूनपर्यंत हे विषय लांबणीवर गेले आहेत.