पालिकेच्या कंत्राटी कामगारांना महिन्याभरासाठी कायम करा

0

पुणे। महापालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असणार्‍या कंत्राटी कामगारांसोबतचा करार पुनर्जीवित करण्यास प्रशासनाने नकार दिल्यावर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मात्र त्यांना निदान महिनाभर तरी कायम करावे, अशी सूचना आयुक्त कुणालकुमार यांना केली आहे. त्यामुळे याबाबत काहीं तरी सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा उत्पन्न झाली आहे.

महापालिकेची संपूर्ण शहरात असणारी उद्याने, रुग्णालये, क्षेत्रीय कार्यालये, पाण्याच्या टाक्या, जलकेंद्र अशा विविध ठिकाणी सुमारे 1700 कंत्राटी कामगार काम करतात. साफसफाई, अतिक्रमण कारवाईत मदत, सुरक्षारक्षक अशा विविध भूमिका त्यांच्याद्वारे बजावल्या जातात. या कामगारांच्या पगारावर वर्षभर 30 ते 32 कोटी रुपये खर्च होतात. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी केवळ 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या खर्चात गणित बसवण्यासाठी 842 कामगारांना घरी बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. याबाबत भिमाले यांनी आयुक्तांना सर्व कामगारांना निदान चालू महिन्यापुरते कायम करावे, अशी सूचना केल्याचे सांगितले.

वर्गीकरणाच्या निधीतून वेतन
याबाबत मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांना नेमके किती कामगार अतिरिक्त आहेत आणि किती कमी करायचे या विषयीची यादीही मागवली आहे. केवळ अतिरिक्त कामगार कमी केले जाणार असून उर्वरित कामगार कायम करून त्यांचे वेतन वर्गीकरणाच्या निधीतून केले जाणार असल्याची माहिती यावेळी भिमाले यांनी दिली. त्यामुळे 500 कामगार सेवेत राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.