पालिकेच्या कार्यक्रमाला महापौर, आयुक्तांनाच डावलले!

0

विरोधी पक्षनेते, गटनेत्यांनाही नाही निमंत्रण

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या विकासकामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला चक्क महापौर, आयुक्तांनाच डावलण्यात आहे. त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले नाही. तसेच विरोधी पक्षनेते, शिवसेना, मनसेच्या गटनेत्यांना देखील निमंत्रण दिले गेले नाही. तसेच विरोधी पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांना देखील उशिरा निमंत्रण दिले आहे. चिंचवड मतदार संघातील पालिकेच्या कार्यक्रमाचे शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना निमंत्रण नसल्यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे.

पिंपळे गुरवमध्ये सब-वे उद्घाटन
गोविंद गार्डन चौक येथे आणि पार्क स्ट्रिट येथे सब-वे बांधण्यात येणार आहे. या कामाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरूवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला महापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते, गटनेते यांना निमंत्रण दिले नसल्याचे पुढे आले आहे. महापालिकेतर्फे विविध विकासकामे केली जातात. उद्घाटन, भूमीपूजन अशा प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन महापौरांच्या परवानगीने व अध्यक्षतेखाली होते. तसेच निमंत्रण विरोधी पक्षनेते, सर्व पक्षांचे गटनेते, स्थानिक नगरसेवकांना दिले जाते. मात्र, सब-वेच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण चक्क महापौर नितीन काळजे यांना आणि प्रशासन प्रमुख असलेले आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाच दिले नाही. तसेच विरोधी पक्षनेता, शिवसेना, मनसेच्या गटनेत्यांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही. तसेच कार्यक्रम सकाळी अकरा वाजता असताना विरोधी पक्षातील स्थानिक नगरसेवकांना रात्री उशिरा निमंत्रण दिल्यामुळे विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मला अगोदरच एक निमंत्रण होते असे सांगत यावर अधिक भाष्य करण्याचे टाळून महापौरांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली, असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात जोरदार रंगली आहे.