दोन महिन्यात मिळणार नागरिकांना सुविधा : महापालिकेचे धोरण
पुणे : सध्या ओषधांच्या वाढत्या किंमती मुळे अनेक रूग्णांना औषधोपचार घेणे अवघड होत आहे. या पार्श्वभुमिवर बाजारातील इतर औषधांपेक्षा स्वस्त असलेली जेनेरिक औषधे नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या चार रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून मेपासून ही सुविधा दिली जाणार आहे.
येथे मिळणार ओषधे
बाजारातील अॅलोपॅथी औषधांपेक्षा जेनेरिक औषधे 50 ते 80 टक्के स्वस्त असतात. एरंडवणा येथील गजानन थरकूडे रुग्णालय, पद्मावती येथील पोटे रुग्णालय, येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय तसेच मंगळवारपेठेतील कमला नेहरू रुग्णालयात या औषधांची मेडिकल सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी ही माहिती दिली.
स्थायी समितीत प्रस्ताव मान्य
महागड्या औषधांप्रमाणेच जेनेरिक औषधेही उपलब्ध आहेत.मात्र, ती रुग्णांना मिळत नसल्याचे सांगत अनेकदा डॉक्टरांकडून ती लिहून देण्यास टाळाटाळ केली जाते. ही बाब लक्षात घेऊन माजी नगरसेवक अनिल राणे तसेच अजय तायडे यांनी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची मेडिकल उभारण्याची मागणी दोन वर्षापूर्वी केली होती. तसेच त्याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यताही दिली होती.
स्टोेअर उभारणीचे काम सूरू
महापालिकेकडून या चारही रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची मेडिकल सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून त्यात पात्र ठरलेल्या कंपन्यांना जेनेरिक औषधांचे स्टोअर सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार, स्टोअर उभारणीचे काम सुरू असून एप्रिल अखेर या रुग्णालयांमधील चारही स्टोअर्सची कामे पूर्ण होणार असून त्या नंतर ती नागरिकांसाठी खुली केली जाणार असल्याचे डॉ. साबणे यांनी स्पष्ट केले.