पालिकेच्या शाळेतील साहित्य चोरीला

0

येरवडा । पालिकेच्या शाळेचे साहित्य चोरीला जाऊन देखील यावर सहाय्यक पालिका आयुक्त काहीच ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका श्‍वेता श्रीशेठ चव्हाण यांनी केला आहे. शहरासह उपनगर भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा फायदा व्हावा या उद्देशाने पालिकेच्या वतीने शाळा उभारण्यात आल्या आहेत. मात्र येरवडा येथील लक्ष्मीनगर भागातील असलेल्या गेनबा मोझे या पालिकेच्या शाळेचे नव्याने बांधकाम करायचे असल्यामुळे येथील शाळेतील मुलांना इतरत्र शाळेत स्थलांतर करण्यात आल्याने सध्या ही शाळा बंद आहे. मात्र येथील सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका शिक्षण विभागाच्या वतीने सुरक्षारक्षक ठेवण्यात न आल्याने या ठिकाणी दिवसरात्र टवाळ मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे महिलांना देखील अशा टवाळखोरांचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ येत असून कायदा सुव्यवस्थेचा असलेला प्रश्‍न हा गंभीर स्वरूपात बनला आहे.

बंद शाळेला कोणी वालीच नसल्याने भुरट्या चोरांचा वावर परिसरात दिवसेंदिवस वाढत आहे. कारण शाळेच्या आवारातील लोखंडी साहित्यासह खिडक्यांचे लोखंडी गज, पत्रे, आणि कपाटे चोरीला गेले आहेत. यासंबंधी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक पालिका आयुक्त विजय लोखंडे यांच्याशी वारंवार तक्रार करून देखील अधिकाऱयाकड़ून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने न्याय मागायचा कोणाकडे? हा मुख्य सवाल चव्हाण यांनी केला असून जर विद्यमान नगरसेवकांच्या तक्रारीकडे अधिकारी लक्ष देत नसतील. तर सर्वसामान्य जनतेची काय?परिस्थिती असेल असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शंकर चव्हाण,निर्मल मंत्री,श्रीकांत चव्हाण, गणेश चव्हाण, गणेश पिंगळे, अमन राठोड, विक्रांत राठोड आदी कार्यकर्त्यांसह चव्हाण यांनी लोखंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देऊन ही अधिकारी संबंधित घटनेवर विचार करत नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. याबाबत पालिकेच्या वतीने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास व चोरट्यावर अंकुश ना बसविल्यास शिवसेनेच्या वतीने येरवडा क्षेत्रीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.