शिरुर । शिरुर नगरपालिकेची तहकुब झालेली सभा नुकतीच पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे व सत्ताधारी नगरसेवक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यामुळे काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता. गणसंख्येअभावी या पुर्वी घेण्यात आलेली शिरुर नगरपालिकेची सभा तहकुब झाली होती. यानंतर विरोधी पक्षनेते नगरसेवक मंगेश खांडरे यांनी केलेले विविध आरोप व उर्दु शाळा पाडण्याचा विषय हा चांगलाच गाजला होता. त्यानंतर सत्ताधारी गटाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर खुलासा केला होता. त्यामुळे या सर्वसाधारण सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. मंगळवारी (दि. 5) तहकुब झालेली सभा पुन्हा घेण्यात आली. सभेच्या प्रारंभी मागील सभेचा वृतांत वाचण्या अगोदरच विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे यांनी मागील सभेत अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर परवानग्या तसेच बांधकाम ठेकेदारांनी केलेली चुकीची कामे यांची चौकशी व्हावी हे विषय उपस्थित केले.
भ्रष्टाचार्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप
नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी अनधिकृत बांधकामांसंदर्भात पाच नगरसेवकांची सदस्यीय समिती गठीत करून त्याचा अहवाल दहा दिवसांत सादर करावा, असा आदेश यापूर्वी दिला होता. या बैठकीच्या सुरुवातीला तो अहवाल सभागृहाला सादर करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. मात्र तसा कुठलाही अधिकार या समितीला नसून कुठलाही अहवाल कायदेशीर अडचणीमुळे देता येत नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. यावेळी खांडरे यांनी समिती तुम्हीच नेमता, समिती नेमण्याचे अधिकार सभागृहाला नसल्याचेही तुम्हीच सांगता व भ्रष्टाचारी लोकांना तुम्हीच पाठीशी घालता असा आरोप करताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. खांडरे यांच्या या वक्तव्याचा नगरसेवक संजय देशमुख, विनोद भालेराव, विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी यांनी कडाडून विरोध केला. एकाच नगरसेवकाला एवढा वेळ देऊ नये अजेंड्यावरील विषय घ्यावेत, भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालत असल्यास तसे सिद्ध करावे अन्यथा आरोप खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. यानंतर सुद्धा मंगेश खांडरे यांनी आपली बाजू लावून धरत अहवाल सादरच करावा अन्यथा कामकाज चालू देणार नाही, अशी भुमिका घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला.
खांडरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार
सत्ताधारी नगसेवकांनी खांडरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. भाजपचे नगरसेवक नितीन पाचर्णे यांनी, खांडरे यांना त्यांचे म्हणणे मांडू द्या, असे सांगितले. गोंधळात कोणतेही कामकाज होणार नाही असे म्हणत सत्ताधारी नगरसेवकांना पाचर्णे यांना विनंती केली. खांडरे यांनी संपुर्ण बाजू मांडताच नगरसेवक विजय दुगड यांनी सांमज्यस्याची भुमिका घेत नगपालिका कायद्यात चौकशी समिती नेमण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे यासंदर्भात कोणताही अहवाल सादर करण्यात आला नाही, असे सांगत भ्रष्टाचार्यांना पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचा निर्वाळा देत खांडरे यांना शांत केले. यानंतर सभागृहात मागील सभेतील विषयांचे वाचन करण्यात आले.
उर्दु शाळेचे नूतनीकरण
उर्दु शाळा ही ऐतिहासिक व एकमेव उर्दु शाळा असल्याने त्याच ठिकाणी शाळेसाठी सुसज्ज इमारत उभारावी, अशी मागणी खांडरे यांनी केली. यानंतर नगरसेवक विजय दुगड, मुजफ्फर कुरेशी यांनी या विषयाला विरोध कोणाचाच नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच जागेवर सुसज्ज व अद्ययावत दुमजली इमारत उभारण्यासाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी दुगड यांच्या सुचनेला अनुमोदन दिले. या सभेला मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, रोहिणी बनकर, बांधकाम समितीच्या उज्ज्वला बरमेचा, ज्योती लोखंडे, मनिषा कालेवार, पुजा जाधव, रेश्मा लोखंडे उपस्थित होते.