खातेनिहाय चौकशी होण्याची शक्यता; कर्मचार्यांचे धाबे दणाणले
पिंपरी चिंचवड : दोन वर्षाची मुदत देवून सुद्धा टंकलेखनाचे प्रमाणपत्र सादर न करणे, तसेच बोगस प्रमाणपत्र जोडल्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील चतुर्थश्रेणी वर्गातून लिपिक पदावर 117 जणांना पदोन्नती देण्यात आली असून त्या पदोन्नतीतील 57 लिपीकांचे टंकलेखन प्रमाणपत्र बोगस आढळून आले आहे. त्या कर्मचार्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. त्यातच दोषी आढळणार्यांना लिपिकांचे चतुर्थश्रेणी पदावर पदावतन करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
बोगस प्रमाणपत्राची आयुक्तांकडे तक्रार…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचार्यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचार्यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचार्यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याच्या शैक्षणिक अर्हतेनूसार पदोन्नती देण्यात आली. परंतू, त्यातील काही कर्मचार्यांनी पदोन्नती मिळविण्यासाठी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची बाब निर्दशनास आली आहे. बोगस प्रमाणपत्र सादर कर्मचार्यांनी ही पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे प्राप्त झाली. त्यामुळे सर्वच कर्मचार्यांचे प्रमाणपत्रे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा तंत्रशिक्षण परिषदेकडून खातरजमा घेण्यासाठी पाठविण्यात आली होती.
कर्मचार्यांवर कारवाईस अडचण..
दरम्यान, संबंधित कर्मचार्यांचा अहवाल महापालिका प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्या कर्मचार्यांचा अहवालात टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे, याविषयी स्पष्ट माहिती तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत परीक्षा मंडळाकडे तीन पत्रे पाठविली आहेत. त्यावर कुठलेही उत्तर त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे टंकलेखन प्रमाणपत्राची योग्य माहिती न दिल्याने महापालिका प्रशासनाला त्या कर्मचार्यांवर कारवाई अडचण निर्माण झाली आहे.
परिक्षा मंडळाकडून उडवाउडवीची उत्तरे…
महापालिका प्रशासन विभागाने पुन्हा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे. चतुर्थ कर्मचार्यांना दिलेल्या पदोन्नतीत टंकलेखन प्रमाणपत्राची माहिती देण्यास परीक्षा मंडळा उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. परीक्षा मंडळाने स्पष्ट अभिप्राय देवून हे टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी सविस्तर माहिती देण्याची विनंती पत्राद्वारे केलेली आहे. तसेच बोगस प्रमाणपत्र आढळणाया त्या कर्मचार्यांची खातेनिहाय चौकशी आदेश देण्यात येणार आहेत. त्यात दोषी आढळणार्या कर्मचा-यांना चतुर्थश्रेणी पदावर पदावतन होण्याची शक्यता आहे. याशिवाय त्या कर्मचा-यांनी महापालिका प्रशासनाला खोटी माहिती सादर करुन फसवणूक केल्याप्रकणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन सेवेतून त्यांना काढण्यातही येवू शकते.