पालिकेने आयुक्तालयासाठी शाळेला ठोकले सील

0

विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या

चिंचवड : विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडून महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारती नियोजित पोलीस आयुक्तलयासाठी भाड्याने दिली आहे. त्यामुळे महापालिकेने शाळेला सील ठोकले असून ही शाळा दळवीनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतरित केली आहे. परंतु, शाळा स्थलांतराला विरोध करीत विद्यार्थ्यांनी आज (शुक्रवारी) शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला आहे. तसेच या निर्णयाला विरोध करत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचा विरोध डावलून महात्मा फुले शाळेमध्येच पोलीस आयुक्तालय सुरु केले जाणार आहे.

प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्याचे निश्‍चित केले आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता देखील दिली आहे. मात्र, पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्‍वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात पालकांनी तीव्र आंदोलन उभारले होते. मात्र, त्यांचा विरोध डावलून ही शाळा दळवीनगर परिसरात स्थलांतरित केली आहे.

पालकांचे विविध मार्गांनी आंदोलन
शाळेतील विद्यार्थ्यांना दळवीनगर येथील रेल्वेलाईनला लागून असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा ‘खडखडाट’ सुरु असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत लक्ष लागणार नाही, असे पालकांचे मत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तलयासाठी सरकारने विद्यार्थ्यांना वार्‍यावर सोडू नये. महात्मा फुले शाळेत वर्ग सुरू ठेवावेत, अशी आग्रही मागणी पालकांची आहे. त्यासाठी पालकांनी विविध मार्गांनी आंदोलनही केले आहे.

प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेकडे
नियोजित पोलीस आयुक्तालयाला चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत भाड्याने देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.13) आयत्यावेळी मान्यता दिली. तसेच हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे पाठविला आहे. आज शुक्रवारी शाळा सुरु झाल्या आहेत. तत्पुर्वीच, महापालिकेने शाळेला सील टोकले. शाळेच्या प्रवेशद्वारासमोर शाळा दळवीनगर येथे स्थलांतरित केल्याचा फलक लावण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाले. त्यावेळी शाळेचे प्रवेशद्वार बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.