युवक काँग्रेस अध्यक्ष जयस्वाल यांची मागणी
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महिला कर्मचार्यांना त्रास देणार्या उच्चपदस्थ अधिकार्याचे नाव जाहीर करावे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यामुळे महापालिकेतील महिला कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी अशा अधिकार्यांची नावे जाहीर करून, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयूर जयस्वाल यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
अधिकार्यांवर कारवाई नाही
त्यात जयस्वाल यांनी म्हटले आहे की, अनुकूल गोपनीय अहवाल लिहिण्याकरिता एका वरिष्ठ अधिकार्याकडून महापालिकेतील महिला कर्मचार्याला त्रास देण्याची बाब उघडकीस आली होती. याशिवाय यापूर्वी देखील एका अधिकार्याने महिला कर्मचार्याला त्रास देण्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली होती. वास्तविक पाहता, शहरातील वाढत्या महागाईमुळे महिला व तरुणींना घराबाहेर पडून काम करावे लागते. मात्र, आपल्या पदाचा गैरफायदा घेत, महापालिकेतील काही उच्च पदस्थ अधिकार्यांकडून महिलांना त्रास दिला जात आहे. महिलांचे कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेत विशाखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील अशा अधिकार्यांवर कारवाई होताना दिसत नाही.