पालीखी प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनासाठी आळंदी व देहुत झाला आढावा बैठक

0

वारकर्‍यांना सर्व सुविधा मिळाव्यात : प्रांत प्रसाद
विविध अधिकारी, पदाधिकार्‍यांना केले मार्गदर्शन

आळंदीः संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान काही दिवसांवर आले आहे. मंदिरातून 6 जुलै रोजी दुपारी चारचे सुमारास श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. या सोहळ्यात सुविधा उपलब्ध करून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे. या प्रस्थान सोहळ्यास आलेल्या वारकर्‍यांना सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने काळजीपुर्वक केलेल्या नियोजनावर कार्यवाही करावी, असे आदेश खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांनी दिले. दिलेल्या नियोजनाचे प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे सूचना त्यांनी केल्या. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये याची काळजी घेण्यास विविध खात्यांना त्यांनी आदेश दिले. आळंदी येथील प्रस्थान सोहळ्याचे आढावा बैठकीत प्रांत प्रसाद यांचे उपस्थितीत आढावा घेण्यात आला. यावेळी आढावा बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, प्रभारी तहसीलदार रवींद्र सबनीस, पालखी सोहळा समन्वयक उदयसिंह भोसले, समन्वयक तहसीलदार रुपाली सरनौबत, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक, विश्‍वस्त अजित कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वीज अभियंता सुभाष ढापसे, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका स्मिता रायकर, प्रतिभा गोगावले, सुनीता रंधवे, नगरसेवक सचिन गिलबिले, विभाग प्रमुख संघपाल गायकवाड, दत्तात्रय सोनटक्के, राजेश पवार, मंडलाधिकारी चेतन चासकर, शासकीय खात्याचे विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी
उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना प्रांत प्रसाद यांनी सांगितले की, प्रथा-परंपरांचे पालन करीत सोहळा मार्गस्थ होण्यासाठी सुसंवादाला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडण्याची दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे. सोहळ्यात नागरी सुविधा, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा यंत्रणा, दर्शन बारी, पोलीस बंदोबस्त, भाविक आणि नागरिक तसेच परिसराची सुरक्षा यावर लक्ष ठेवले पाहिजे. पाण्याचे टँकर, वाहन प्रवेश, पार्किंग, अतिक्रमण कारवाई, पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवला पाहिजे. पासशिवाय वाहनांना प्रवेश देऊ नये. भाविकांसाठी केरोसीन आणि इंधन गॅस पुरवठा पुरेशा प्रमाणात मिळेल याची दक्षता महसूल प्रशासनाने घेण्याचे आदेश देण्यात आले. केलेल्या यात्रेतील नियोजनावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षात सर्व प्रकारची माहिती विभाग निहाय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या 2 तारखेपर्यंत सर्व प्रकारची तयारी पूर्ण करून अंतिम आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

पाण्याची तपासणी करावी
बैठकीत सूचना प्रांत प्रसाद पुढे म्हणाले की, पाणी नमुने आणि उघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच हॉटेल तपासणी करून दोषींवर कारवाईसाठीचे प्रस्ताव माझ्याकडे आणून द्यावेत. रस्ते, भाविक आणि नागरिकांना खुले राहतील याची दक्षता परिषदेने घेण्यास यावेळी त्यांनी आदेश दिले. यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल. वीज पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता महावितरणने घेण्याचे आदेश देत संपर्क यंत्रणा सुरु राहील यासाठी त्यांनी सुनावले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेविका स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांचेसह विविध अधिकारी, प्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांनी चर्चेत भाग घेतला. उपस्थित ठेकेदारांनी खात्यातील इतर विभागांशी संवाद साधून उर्वरित कामे 2 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. मुख्याधिकारी समीर भूमकर या बैठकीस अनुपस्थित असल्याने पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छता गृहांची स्वच्छता, शहराची स्वच्छता, जंतुनाशके फवारणी, धुरीकरण यावर स्मिता रायकर, सुनीता रंधवे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्य विभागाचे प्रमुख उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.