बळीराजा हवालदिल झाल्याने आकाशाकडे नजरा
नवापूर:चक्रीवादळाच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसानंतर बळीराजा सुखावला होता. 6 जूननंतर परिसरात पावसाला सुरुवात होत असते. यंदा चक्रीवादळाच्या दिवशी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अनेक शेतकर्यांनी पहिल्या पावसात खरिपाची पेरणी केली आहे. मात्र, सध्याचे कडक उन्हात बियाणे व जमिनीतून बाहेर येत असलेले अंकुर जळून जात असल्याने शेतकर्यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
पेरणीची कामे खोळंबली
तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची नांगरणी व वखरणीसह पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केलेली असली तरी पावसाअभावी पेरणीची कामे खोळंबली आहेत. अधूनमधून येणारा थंडगार वारा यामुळे पाऊस येत नसल्याचे संकेत आहेत. वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होत असतो. अधूनमधून वातावरणामध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचे वातावरण तयार होते. मात्र, त्यानंतर परत ऊन्हाने पावसाची येण्याची शक्यता धिसुर होऊन जाते. 6 जून रोजी दुपारी दीड तास बर्यापैकी पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला होता. पावसाचे आगमन झाल्याने पेरणीची लगबग सुरू झाली होती. शेतीची अंतर्गत मशागत पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, रासायनिक खते यासाठी पैशांची जुळवाजुळव करणे या दिव्यातून मार्ग काढत शेतकर्यांनी पेरणी करुन अनुकूल शेत जमीन तयार केली होती. शेतीसाठी लागणारे बी-बियाणे व त्या संबंधित साहित्यही लॉकडाऊनच्या काळात पैसे खर्च करत शेतकरी राजाने शेती कामाला सुरुवात केली होती. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. पावसाला उशीर झाला तर पेरणी केलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील आदिवासी सोसायट्यांनी नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना कर्ज वितरण केले असले तरी थकबाकीदार शेतकर्यांचाही सद्यस्थितीत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, अशी मागणी व अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तालुक्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका, तांदूळ, कापूस, तूर, उडीद ही पारंपरिक पिके घेण्याबरोबर तुरळक ठिकाणी भाजीपाला लागवड केली जाते. बदलत्या परिस्थितीनुसार शेतीमध्येही काही प्रमाणात बदल केल्याचे दिसून येते तर काही ठिकाणी अजूनही पारंपरिक शेतीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील आदिवासी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असल्याचेही दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान शेतीसाठी राबराब राबणारा आदिवासी बांधव पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात असुन शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अनेक शेतकर्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.